औरंगाबाद: गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यचा राजकीय संधिकाल आता अखेरच्या टप्प्यात आल्याचे दिसते. काल मतदारांनी दिलेला कौल लक्षात घेता जिल्ह्यात राजकीय परिवर्तन अटळ असल्याची चर्चा आहे. तरीही चौरंगी लढतीने ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी स्थिती निर्माण झाली यात शंका नाही.
तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत पोहोचला तरीही मतदारांच्या उत्साहात तिळमात्रही फरक जाणवला नाही. मतदारांना सोयीसुविधा पुरविण्यात प्रशासनाचे प्रयत्न तोडके पडले. भर दुपारी मतदान केंद्रावरील रांगा मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास दाखवून देत होत्या. शहरासह जिल्ह्यात लोकांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. त्यामुळे 61.87 टक्के मतदान होऊ शकले. महिला आणि तरुणांचीही मतदानावरील आस्था दिसून आली. भीमा-कोरेगाव प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा, शहरात झालेली दंगल या तिन्ही घटनांचा प्रभाव या वेळी मतदानावर जाणवला. चंद्रकांत खासदार चंद्रकांत खैरे यांचे पारंपरिक मतदारांची नाराजी, वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच या निवडणुकीत उडी घेतली अन जबरदस्त लढत दिली. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सुनियोजित पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून काँग्रेसपासून दूर गेलेल्या मतदारांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात काँग्रेसची स्थिती काहीशी मजबूत झाली होती. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी चांगला जोर लावल्याने खासदार खैरे यांची हक्कांची मत पेटी पळवल्या गेली. त्यामुळे आता निवडणूक मतदानानंतर झालेल्या आकडेवारीवर प्रत्येकजण दावा ठोकत आहे.
एमआयएमने तर मंगळवारीच फटाके फोडले. किमान चार लाख मते मिळतील असा त्यांचा दावा आहे. उर्वरित सात लाखांमध्ये खैरे -झांबड आणि जाधव वाटेकरी होतील असे त्यांचे गणित आहे. दुसरीकडे ओबीसी आणि परंपरागत मतदारांमुळे खैरे विजयी होतील असा दावा सेना करीत आहे. तर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी मतदारांनी सुभाष झांबड यांची निवड केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना ही विजयाची खात्री आहे. किमान चार लाखाहून अधिक मतदान आपल्याला पडेल, असे जाधव छातीठोकपणे सांगतात.
मतदारांचे कौतुक
मतदान करण्यासाठी प्रशासन तसेच विविध संस्थांकडून जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीचा मोठा लाभ यावेळी झाल्याचे दिसते. उष्णतेचा तडाका आणि रखरखते उन यामुळे मतदानाचा टक्का घसरेल अशी भीती व्यक्त होत होती. मात्र गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी चांगले मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांसाठी फारशा सुविधा नव्हत्या तरी कुणीही तक्रार केली नाही. भर उन्हात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेटीत बंद झालेल्या मतदानाचा कौल येत्या 23 मे रोजी कळणार आहे. तोपर्यंत चारही उमेदवारांना विजयी म्हणायला काय हरकत आहे.
नवा नेता मिळेल... ?
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला यावेळी नवा नेता मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खा. खैरे यांच्यावरील नाराजी, भाजप सेनेतील उघड मतभेद, शहरातील पाणी, कचरा, रस्ते आदी प्रश्न, ग्रामीण भागात पाणीटंचाई या सर्वांचा नकारात्मक परिणाम मतदारांवर झाला. त्यातच या निवडणुकीत जातीय समीकरणांनी उचल खाल्ल्याचे दिसले. तो फॅक्टरही प्रभावी ठरणार आहे. त्यामुळेच यावेळी जिल्ह्याला नवा नेता मिळेल, असा दावा केला जात आहे.